पक्षाच्या अस्तित्वा करिता लोकसभा लढण्याची गरज ; एमआयएम पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना

Foto
औरंगाबाद :  येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एम आय एम ने नुकताच वंचित बहुजन आघाडीशी संसार थाटण्याचे निश्चित केले. त्यानुसार औरंगाबाद लोकसभेतून  माजी न्यायमूर्ती  बी.जी. कोळसे पाटील यांची उमेदवारी आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली. परंतु मराठवाडयाच्या दृष्टीने औरंगाबाद लोकसभेचे  महत्व व पुढील विधानसभा निवडणुका लक्षात घेता पक्षाच्या अस्तित्वा करिता एमआयएमनेच लोकसभा लढवण्याची गरज असल्याची भावना पक्षातील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळत आहे.

येत्या महिनाभरात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू झाली असून, अनेक पक्षांनी आपले उमेदवार घोषित करणे देखील सुरू केले आहेत. याच लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने एमआयएम ने वंचित बहुजन आघाडीशी घरोबा केला आहे. त्यानुसार बी. जी. कोळसे पाटील यांची जिल्हा लोकसभे साठी उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. ही उमेदवारी घोषित केल्यापासून एमआयएम मध्ये असंतोष दिसून येत असून, नुकत्याच पार पडलेल्या  एमआयएमच्या बैठकीत इमतियाज जलील यांनी जिल्ह्यातील लोकसभेच्या रिंगणात उतरावे अशी गळ कार्यकर्त्यांनी घातली होती. याच मुद्द्यावरून अजूनही एमआयएमची स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत असून, औरंगाबाद हे मराठवाड्याची राजधानी आहे. त्यामुळे मराठवाड्यातील राजकारणाच्या दृष्टीने औरंगाबाद लोकसभेचे एक वेगळे महत्त्व आहे. तसेच येथे महापालिकेत पक्षाच्या २५ नगरसेवकांसह जिल्ह्यात लाखांच्या आकड्यात असलेली मतदारांची संख्या, अशी मोठी ताकत आहे. अशात जर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत पक्षाचा उमेदवार नसला तर मुस्लिम मते ही काँग्रेससह इतर सेक्युलर पक्षांकडे वळण्याची दाट शक्यता असल्याने पुढील सहा महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत याचा मोठा फटका पक्षाला बसण्याची संभावना नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील निवडणुका लक्षात घेता  पक्षाच्या अस्तित्वा करिता जिल्ह्यातून एमआयएमनेच लोकसभेच्या रिंगणात उतरावे अशा कार्यकर्त्यांच्या भावना असून, दबक्या आवाजात त्या ऐकायलाही मिळत आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker